बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या राजकतेमुळे पंतप्रधान शेख हसीना या आपल्या पदाचा राजीनामा देऊन भारतात आल्या आहेत. काही देशांनी त्यांचा व्हिसा देखील नाकारल्याने सध्या त्या भारतातच आहेत. यावरूनच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
उद्धव ठाकरे हे आज दिल्ली दौऱ्यावर असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना बांग्लादेशच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देत सरकारला इशारा देखील दिला. जगभरात जनतेचा संयम सुटतोय, त्यामुळे जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बांग्लादेशमध्ये अराजक निर्माण झालं आहे, त्यामुळे शेख हसीना भारतात आल्या आहेत. तुम्ही जर शेख हसीनांना संरक्षण देत असाल तर हिंदुंनाही संरक्षण द्या. बांग्लादेश मधील हिंदूंचं रक्षण करणं ही देखील केंद्र सरकारची जबाबदारी आहे. संयम सुटल्यावर काय होतं हे बांग्लादेशनं दाखवलंय. जनतेचा संयम सुटतोय, त्यामुळे जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका.’
दरम्यान शेख हसीना यांना आधी युनायटेड किंगडमने आश्रयास नकार दिला होता तर आता अमेरिकेने देखील त्यांचा व्हिसा रद्द केला आहे. ज्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.