सांगली : सध्या राज्यातील अपघाताचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सांगलीमध्ये असाच एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे कुटुंब सांगलीतील जत या ठिकाणी राहत होते. विजापूर – गुहागर राज्य मार्गावर जत पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये स्वीप्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
चालक दत्ता हरीबा चव्हाण (वय 40रा.जत), नामदेव पुनाप्पा सावंत (वय 65), पदमिनी नामदेव सावंत (वय 60), श्लोक आकाशदिप सावंत (वय 8) मयुरी आकाशदिप सावंत (वय 38) अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघातात वरद सावंत (वय 10) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी सांगलीला हलवण्यात आले.
हा अपघात घडला तेव्हा बाकी सगळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक दत्ता हा जखमी होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचा वाटेतचं मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.