आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा रणनीती आखत असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला धक्का बसण्याची शक्यता असून सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी निवडणूकच न लढण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा विशेष रणनीती आखताना पाहायला मिळत असून या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवडणूक संयोजक पदाची जबाबदारी ही देण्यात आली आहे. असं असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रातील सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मात्र निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भात त्यांनी भाजपातील वरिष्ठ नेत्यांना पत्रदेखील पाठवलं आहे.
सुधीर गाडगीळ हे 2014 आणि 2019 ला सांगली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मीतभाषी आणि संयमी नेता अशी ओळख असणाऱ्या सुधीर गाडगीळ यांना 2024 ला ही पुन्हा एकदा भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आता स्वतः गाडगीळ यांनीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सुधीर गाडगीळ यांच्या या निर्णयावर आता भाजपाचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पहाणं महत्त्वाचं असणार आहे…