पुणे शहरात टोळक्यांकडून प्रचंड दहशत माजवण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये घडली. सुतार काम करणाऱ्या एका कारागिराकडे खंडणीची मागणी करत बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी समीर जाधव, अनिकेत सपकाळे व त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. तर भागिरथ राम बिष्णोई (वय २९, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिश्नोई आणि त्यांचे भाऊ हे सुतार काम करतात. 15 दिवसांपूर्वी ते फर्निचरची बनवण्यासाठीची ऑर्डर घेण्यासाठी नेरे भागात एकटेच गेले होते. त्यावेळी त्यांना आरोपींनी अडवले. त्यांच्यावर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. ‘तुम लोग यहाँ बाहरसे आके इतना पैसा कमाते हो, उसमेसे कुछ पैसा हमको देना पडेगा’, असे आरोपी म्हणाले. तेव्हा फिर्यादी त्यांना उत्तर देत, हम तो गरीब मजदूर है सहाब, आपको कहा से पैसा दे’, असे म्हणाले. त्यावर ‘एक दिन तुझे देख लेंगे’, असे म्हणून आरोपी निघून गेले.
मात्र आरोपी तात्पुरते निघून गेले होते. कारण रविवारी सकाळी ते फिर्यादींच्या दुकानात आले. तिथे देखील फिर्यादींना दमदाटी करत या तीन आरोपींनी धमकी दिली. ‘तुझे बोला था ना यहा पे कमाना है, तो हमको भी कुछ पैसा देना पडेगा, फिर भी तुने पैसा नही दिया, तू एसे मानेगा नही’, असे म्हणत फिर्यादींना मारहाण करायला सुरुवात केली. फिर्यादींच्या डोक्यात, पाठीत, छातीवर लाकडी दांडक्याने मारल्याने ते बेशुद्ध पडले. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींवर कारवाई सुरू आहे.