पुणे शहरात बुधवारी मध्यरात्री कर्नाटकातील एका नागरिकाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कर्नाटकातील मंगलूर येथे वास्तव्यास असतात. ते एका ट्रॅव्हल एजन्सी असलेल्या कंपनीत एजंट म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या बहिणीचे मुंबईमध्ये निधन झाले. त्यासाठी मंगलूर वरून निघाल्यानंतर ते पुण्यात मुक्कामासाठी थांबले होते. फिर्यादी आणि त्यांची पत्नी हे पुण्यातील अरोरा टॉवर येथील हॉटेलमध्ये थांबले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास फिर्यादी आपल्या पत्नीला सिगारेट पिऊन येतो असे सांगून हॉटेलमधून बाहेर पडले व एका रिक्षात बसले. त्यांनी रिक्षा चालकाला पुण्यात फिरवण्यास सांगितले. त्यानंतर या रिक्षा चालकाने रिक्षात थेट बुधवार पेठेत आणली व त्याला खाली सोडले व यहाँ सबकुछ मिलता है, असे म्हणून रिक्षा चालक निघून गेला. त्यानंतर फिर्यादी सिगरेट पीत उभे असताना दोन तरुण त्या ठिकाणी आले. जबरदस्तीने धमकावून फिर्यादी कडील मुद्देमाल चोरला. फिर्यादीने विरोध करतात आरोपींनी त्यांचे हात धरून ठेवले. त्यांच्या हातातील चार सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल, पाकिट असा एक लाख ८० हजाराचा ऐवज लुटून आरोपी पसार झाले व घाबरलेले फिर्यादी पुन्हा हॉटेलमध्ये गेली.
दुसऱ्या दिवशी त्यांनी पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी फैय्याज मोहंमद गौस शेख (२६, रा.दांडेकर पुल) आणि वैभव उदय धोत्रे (३२, रा.स्वारगेट) या दोन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे.