‘तिने आई-वडिलांची शपथ घ्यावी, मी बोललो असतो तर माफी मागितली असती’; महिला पत्रकारावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपावर वामन म्हात्रे यांची पहिली प्रतिक्रिया
बदलापुरात 4 वर्षीय दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. बदलापूर मध्ये देखील नागरिकांनी रस्त्यावर येत घटनेचा निषेध केला. त्याचवेळी या घटनेचा वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या महिला पत्रकारावर शिंदे गटाच्या नेत्याने आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली. ‘तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’, अशी टिप्पणी शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी मोहिनी जाधव नावाच्या महिला पत्रकारावर केली. त्यामुळे वामन म्हात्रे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत असताना आता पहिल्यांदाच त्यांनी स्वतः यावर प्रतिक्रिया देत आपण असे काही बोललोच नसल्याचा दावा केला.
काय म्हणाले वामन म्हात्रे ?
वामन म्हात्रे म्हणाले, ‘मोहिनी जाधव ही आमच्या इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं काम करते. काल जे आंदोलन झालं ते, तिला वेगळ्या पद्धतीने न्यायचे असेल म्हणून ती स्टंटबाजी करण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्यावर चुकीचे आरोप करत आहे. जे शब्द तिने या वामन म्हात्रेच्या तोंडात टाकले, ते मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही असे शब्द काढणार नाही. मलाही आई-बहीण आहे. चांगली शिकवण आहे. त्यामुळे मी कधीच असे शब्द बोलणार नाही. पण तिने याबद्दल आई-वडिलांची शपथ घ्यावी. जर ती बदलापूरमध्ये जन्माला आली असेल तर तिला हे एक खोट बोलण्यासाठी हजार वेळा खोटं बोलावं लागेल आणि आता त्यासाठी मी सुद्धा तयार आहे. वामन म्हात्रे आगरी समाजात जन्मालेला माणूस आहे. मी आजवर कधीच कोणाला घाबरलो नाही आणि घाबरत नाही. मी जर तसं बोललो असतो तर, तिचे पाय धरून माफी मागितली असती. पण ती स्टंटबाजी करत आहे. मुद्दाम मला बदनाम करत आहे. मी इथल्या महिलांसाठी काम करतो. ही तिची राजकीय स्टंटबाजी आहे. या स्टंटबाजीला घाबरत नाही.’
या शब्दात वामन म्हात्रे यांनी स्वतःचा बचाव करत मोहिनी जाधव या पत्रकारावर प्रत्यारोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. पत्रकार मोहिनी जाधव यांचा समर्थनार्थ अनेक नेते उभे राहिले असून वामन म्हात्रे यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या आरोपावर त्या ठाम आहेत.