मुंबई- केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्या प्रकरणी मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे. या ठिकाणी पाहणी करण्यासाठी अधिकारी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेच्या के वेस्ट विभागाचे अधिकारी बंगल्यात जाऊन छायाचित्र आणि मेजरमेंट घेण्यासाठी येणार असल्याचे कळविले आहे. यावेळी बंगल्यासाठीचे मंजूर केलेले प्लान आणि अधिकृत कागदपत्रे घेऊन हजर राहण्यास सांगितले आहे. नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार होती. या तक्रारीनंतर बंगल्याची तपासणीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. अंधेरी जुहू येथील तारा रोडवर उभारण्यात आलेल्या या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी या संदर्भात तक्रार केली होती.
शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातूनच राणे यांना महापालिकेने नोटीस पाठवल्याने पुन्हा एकमेकांवर आरोपांची राळ उडवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.