पुणे- पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपत असल्याने ही निवड फक्त सात दिवसांचीच असणार आहे. या सात दिवसांसाठी अध्यक्षपदासाठी कोणाचे नाव पुढे येणार याची चर्चा केली जात आहे.
पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपत आहे. ही मुदत संपण्यापूर्वी स्थायी समितीच्या ८ सदस्यांची नियुक्ती आणि अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. महापालिका स्थायी समितीच्या ८ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. रिक्त होणाऱ्या जागी नव्याने स्थायी समिती सदस्यांची निवड करायची की नाही याची विचारणा महापालिकेने राज्य सरकारकडे केली होती. राज्य सरकारने पत्र पाठवून २८ फेब्रुवारीच्या सभेत नवीन आठ सदस्यांची निवड करावी अशी सूचना केली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या इतिहासात सलग तीन वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या हेमंत रासने यांच्यानंतर ७ दिवसांसाठी अध्यक्षपदासाठी अन्य कुणाचे नाव पुढे येणार की पुन्हा हेमंत रासने यांचीच पुन्हा निवड केली जाणार हे पाहावे लागेल.
या सदस्यांचा समावेश
महापालिकेतून रिक्त होणाऱ्या आठ सदस्यांमध्ये भाजपचे 4, राष्ट्रवादीचे 2, तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांना केवळ 14 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. याबरोबरच येत्या 28 तारखेला स्थायी समितीच्या अध्यक्षाचा कार्यकाळही संपणार आहे. त्यामुळे या सदस्यांची निवड झाल्याशिवाय पुढील स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेता येणार नाही. त्यामुळे महापालिकेनेही या सदस्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सदस्यांचा कार्यकाळ संपला
भाजप – वर्षा तापकीर, उज्ज्वला जंगले, मानसी देशपांडे, सुनीता गलांडे, राष्ट्रवादी – नंदा लोणकर, अमृता बाबर, काँग्रेस – लता राजगुरू, शिवसेना – बाळासाहेब ओसवाल