पुणे- भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणी सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज किरीट सोमय्या पुण्यात दाखल झाले असून आज ज्या पायरीवर त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती त्या पुणे महापालिकेच्या इमारतीमधील पायरीवर त्यांचा भाजपतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. पुन्हा वाद होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेच्या आवारात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
काँग्रेसचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
धक्काबुक्की प्रकरणात काँग्रेसने देखील उडी घेतली आहे. आमचा किरीट सोमय्या यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला विरोध आहे. महापालिकेच्या इमारतीचा वापर विकासकामांच्या कार्यक्रमासाठी करावा, राजकारण करण्यासाठी नाही, असे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी म्हटले आहे. याबाबत पालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. कार्यक्रमाला परवानगी दिली तर काँग्रेस रस्त्यावर येणार असा इशाराही बागवे यांनी दिला आहे.