राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला. पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या सात ते आठ पथकांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र अखेर बुधवारी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मात्र अगदी शिताफीने गायब झालेल्या जयदीपला पोलिसांनी नेमकं कसं पकडलं ?
जयदीप हा कल्याणचा राहणारा आहे. पुतळा कोसळल्या प्रकरणी त्याच्यावर सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दुर्घटनेच्या दिवशीच तो घरातून पसार झाला. त्या पाठोपाठ त्याची आई, पत्नी आणि कुटुंबही शहापूरला निघून गेलं. सिंधुदुर्ग पोलीस, सिंधुदुर्ग गुन्हे शाखा, कल्याण गुन्हे शाखा, ठाणे गुन्हे शाखा आणि कल्याण स्थानिक पोलीस यांच्या पथकानं जयदीप चा शोध सुरू केला. जयदीप आपल्या कुटुंबाला भेटायला येईल त्यामुळे पोलिसांनी त्याची आई व पत्नीला पुन्हा घरी आणलं. जयदीप ची पत्नी निशिगंधा आपटे यांनी जयदीप बुधवारी भेटायला येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोन पथकं त्याच्या घरा जवळ तैनात केली. जयदीप डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क लावून कसारा येथून लोकल पकडून कल्याणला उतरला. तिथून घरी जात असताना पोलिसांनी त्याला पाहिलं. तो जयदीपच असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्याला अडवलं, ओळखपत्र मागितलं. मात्र तेव्हा जयदीप घाबरला. आपल्याला सोडण्याची विनंती करू लागला. तेव्हाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी लावलेल्या जाळ्यात जयदीप अडकला आणि पकडला गेला. जयदीपला भेटण्यासाठी त्याची आई आणि पत्नी निशिगंधा या घराबाहेर आल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना जयदीप ला भेटू दिले नाही. त्याला अटक करून थेट सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. आता जयदीपवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.