पुणे जिल्ह्यात वाळू माफियांवर धडक कारवाई, 20 यांत्रिकी बोटी नष्ट तर 1 कोटी 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

130 0

पुणे- जिल्ह्यातील दौंडमधल्या भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल आणि पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. या कारवाईत 20 यांत्रिक बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उद्धवस्त केल्या. तसेच एक कोटी 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भीमा नदीच्या पात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा केला जात होता. हा प्रकार राजरोसपणे सुरू होता. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी थेट भीमा नदीच्या पात्रात जाऊन कारवाई केली. तब्बल १० तास ही कारवाई सुरु होती. या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या 20 यांत्रिक बोटी नष्ट केल्या तर एकूण एक कोटी 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्यात फक्त पुण्यातील दौंडमध्येच नाही तर इतर ठिकाणी देखील वाळू माफियांचा हैदोस आहे. वाळू माफियांवर कारवाई केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यात आल्याचेही प्रकार राज्यात घडले आहेत. आता या सर्व प्रकरणाकडे गंभीरतेनं पाहत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे. महसूल विभाग आणि पोलिसांनी वेळोवेळी वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्यास वाळू माफियांना लगाम बसू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!