PUNE CRIME NEWS : सिबिल स्कोअर खराब असणाऱ्यांना व्यावसायिक कर्ज देण्याचं आमिष दाखवून फसवणूक ; तिघांना बेड्या…(VIDEO)

317 0

पुणे : सिबिल खराब असणाऱ्या लोकांना व्यवसाय करण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देतो, अशी सोशल मीडियावर जाहिरात करून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका कंपनीच्या तीन जणांना पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

बाणेर येथील टेक्नो स्पेस या इमारतीमधील बी 1008 या ऑफिसमध्ये जलाराम इंटरप्रायजेस नावानं एक कंपनी सुरू करण्यात आली होती. या कंपनीच्या माध्यमातून सोशल मीडियावर जाहिरात करून व्यवसाय करण्यासाठी एक कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं.

कर्ज मिळवून देण्यासाठी कंपनी अर्जदाराकडे पाच लाख रुपयांचं सेक्युरिटी डिपॉझिट मागत होती मात्र या प्रकरणातील फिर्यादी श्रीराम प्रल्हाद पिंगळे यांना कंपनीच्या एकूणच व्यवहारावर संशय आल्यानं त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत कंपनीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बनावट कर्जदाराद्वारे सापळा रचून संबंधित कंपनीकडे कर्जाची मागणी केली.

कर्जाची मागणी करताच पोलिसांनी पाठवलेल्या बनावट कर्जदाराकडे कंपनीनं एक कोटीच्या कर्जासाठी सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून पाच लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास केला असता संबंधित कंपनीकडे आरबीआयच्या गाईडलाईनप्रमाणे कोणतीही परवानगी किंवा नोंदणी नसल्याची खात्री झाली शिवाय कंपनीत काम करणाऱ्या सात महिलांकडे अपॉइंटमेंट लेटर नसल्याचंही तपासात उघड झालं. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी या कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला.

जलाराम कंपनीनं वाशी येथेही अशाच प्रकारे कंपनीची शाखा उघडून लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी जलाराम इंटरप्रायजेस कंपनीच्या मॅनेजर राधिका यतीश आंबेकर, जलाराम कंपनी चालवणारे संदीप समुद्रे आणि जयजित गुप्ता यांना अटक केलीये.

Share This News
error: Content is protected !!