जागतिक एड्स दिवस : दरवर्षी १ डिसेंबर रोजी अर्थात आज जगभरात जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, 2021 मध्ये जगभरात सुमारे 6,50,000 जणांचा HIV मुळे मृत्यू झाला. दुसरीकडे, भारत सरकारच्या नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, 2021 मध्ये एड्सशी संबंधित आजारांमुळे सुमारे 42 हजार जणांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत या आजाराबाबत लोकांना जागरुक करणे अत्यंत गरजेचे आहे. या उद्देशाने दरवर्षी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. जाणून घेऊया या दिवसाशी संबंधित काही खास गोष्टी.
जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता व्हावी यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यू यांनी जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार 1987 मध्ये मांडला होता. त्यानंतर 1988 पासून 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात येतो. एड्स हा असा आजार आहे, ज्यांच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही. यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स (HIV) व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी जागरुकता अत्यंत आवश्यक आहे.
एड्स दिन जागतिक स्तरावर साजरा करण्याची सुरुवात WHO ने 1988 मध्ये केली. त्यावेळच्या अंदाजानुसार, सुमारे 90,000 ते 1,50,000 लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह होते.जागतिक एड्स दिन हा जागतिक आरोग्य म्हणून साजरा केला जाणारा पहिला आंतरराष्ट्रीय दिवस होता.
त्यानंतर युनायटेड नेशन्स एजन्सीने या जबाबदाऱ्या आपल्या हातात घेतल्या. दरवर्षी या दिवशी युनायटेड नेशन्स एजन्सीज, सरकार आणि लोक एकत्र येऊन एचआयव्हीशी संबंधित एका विशेष थीमवर मोहीम राबवतात आणि लोकांना या आजाराबाबत जागरूक करतात. दरवर्षी या दिवसाची थीम ठरवली जाते. दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करून एड्ससारखा घातक आजार अजूनही संपलेला नाही याची आठवण जनतेला आणि सरकारला करून देण्याचा प्रयत्न केला जातो. ही एक गंभीर समस्या आहे आणि ती समूळ नष्ट करण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे. यासोबतच या आजाराने त्रस्त लोकांसाठी निधी उभारून त्यांच्यासाठी चांगल्या संधी निर्माण करण्याची गरज आहे.