पुणे : पुणे शहरात अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी असतानाही अनेक जड वाहनांचा शहरात सर्रास शिरकाव सुरूच आहे. आता नवले पुलावरील भीषण अपघाताची घटना ताजी असताना एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतायेत. वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची घुसखोरी, कायदा काय सांगतो?, कारवाईचा फक्त दिखावा होतोय का ? आणि वर्षभरात किती जणांना आपला जीव गमवावा लागलाय.. याचाच आढावा घेणारा पाहूया टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट….
शहरात वाहतूक कोंडीची समस्या काही केल्या सुटत नाही. प्रशासनाकडून तात्पुरत्या उपाययोजना होतात पण पुढे परिस्थिती मात्र जैसे थे च बघायला मिळते. तर वाहतूक कोंडीला बंदी असलेल्या रस्त्यांवरील अवजड वाहनांची वाहतूक याला कारणीभूत ठरतेय. शहरात अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय.
सकाळी दुपारी किंवा ऐन रहदारीच्या वेळी शहरात अवजड वाहनांची ये-जा सर्रास सुरू आहे. काँक्रीट मिक्सर, मालवाहू ट्रक, डंपर अशी वाहन गर्दीच्या ठिकाणाहून भरधाव जातात. कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, एफसी रोड,टिळक रोड, बाजीराव रस्ता,छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लाल बहादूर शास्त्री रस्ता अशा मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या रस्त्यांवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे.
वाहतूक शाखेने अवजड वाहनांना दिवसा शहरात ये-जा करण्यास मनाई केली आहे. त्याबाबतचे फलक ठीकठिकाणी लावावेत असं पत्रही त्यांनी महापालिकेला दिलं आहे. मात्र त्याबाबत अजूनही महापालिकेकडून कुठलीही ठोस कारवाई झाली नाही.
साडे सात हजार किलो पेक्षा जास्त वजन असणारी वाहने ही जड वाहने म्हणून संबोधली जातात. संबंधित जड, अवजड वाहनांना निर्धारित वेळेतच प्रवेश देण्यात येतो. त्या व्यतिरिक्त शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभारी पोलिसांना दिल्याचं वाहतूक विभाग सांगतो.
मागील 10 महिन्यांत अवजड वाहनांमुळे 145 अपघात झालेत. त्यात जवळपास 83 जणांचा मृत्यू झालाय.100 च्या आसपास गंभीर जखमी झालेत. 10 महिन्यांत केवळ 245 अवजड वाहनचालकांवर कारवाई झाली असून 66 वाहन चालकांकडून केवळ 36 हजारांचा दंड वसूल केला आहे.
असं असूनही संबंधित वाहन चालकांवर कारवाई करण्याचा केवळ दिखावा केला जातो का ? हा प्रश्न उपस्थित होतो. शहरात अवजड वाहनांची घुसखोरी कधी थांबणार ? आणि प्रशासनाला आणखी किती जणांचे निष्पाप बळी घ्यायचेत हाच प्रश्न उपस्थित केला जातोय.