Ajit Pawar press conference : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा -विरोधीपक्षनेते अजित पवार (Video)

402 0

मुंबई : विधिमंडळ अधिवेशन आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात बहुमताचे सरकार असतानादेखील राज्यात मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? असा प्रश्न त्यांनी शिंदे-फडणीस सरकारला विचारला आहे. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

राज्यात बहुमताचे सरकार आहे. तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, हा जनतेचा अपमान आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. तसेच राज्यात बहुमताचे सरकार असताना अधिवेशन का घेतल्या जात नाही, अधिवेशन घ्यायला तुम्हाला कोणी अडवलं आहे? असा प्रश्नही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे. राज्यात सध्या अतिवृष्टी सुरू आहे. आमचे अनेक आमदार त्या भागात जाऊन पाहणी करत आहे. हे प्रश्न मांडण्यासाठी विधिमंडळ हे हक्काचे ठिकाण आहे. मात्र, अधिवेशन होत नसल्याने हे प्रश्न मांडायचे कुठे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकराकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला पत्रही लिहीले आहे. ”राज्यात सध्या अतिवृष्टी सुरू आहे. कधी नव्हे ती यंदा जुलै महिन्यात धरणं भरली आहेत. विदर्भ, मराठावाड्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, असं ते म्हणाले. तसेच राष्ट्रपती निवडणुकीच्या दिवशी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यंत्री दोघांचीही भेट घेतली. तसेच या प्रकरणात तातडीने लक्ष घाला अशी विनंती केली. मात्र, अद्याप काहीही प्रयत्न सरकारकडून झाले नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

“नेहमीच्या नियमांप्रमाणे मदत करून चालणार नाही”

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत अजित पवार यांनी शेतकऱ्यांना नेहमीच्या नियमांप्रमाणे मदत करून चालणार नाही, असे म्हटले आहे. नियमांच्या पलिकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करावी लागेल, असे ते म्हणाले. निसर्ग असेल किंवा इतर वादळे असतील, यावेळी त्यावेळी एसडीआरएफचे नियम बाजुला ठेऊन महाविकास आघाडी सरकारने मदत केली होती. तशा पद्धतीने आताही मदत करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणावरून भाजपा टोला

ओबीसी आरक्षणाच्या श्रेयवादावरून अजित पवार यांनी भाजपाला खोचक टोला लगावला. ओबीसी आरक्षण आमच्यामुळेच मिळालं, असा आव आणण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करत आहे. मात्र, ही मागणी सर्वांची होती आणि यासाठी सर्वांनीच मदत केली, असे ते म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!