नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे.गुरुवारी रात्री ढगफूटी सदृश पाऊस झाला. काही अवधीतच रस्ते जलमय झाले. त्यामुळं नागरिकांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय.
ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर, नदीकाठच्या अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. यात काही नागरिक बेपत्ता असल्याचीही माहिती आहे.रात्रीपासूनच घटनास्थळावर मदतकार्य करण्यासाठी शासकीय यंत्रणा दाखल झाल्या आहेत. सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जेसीबीच्या सहाय्याने नागरिकांचं रेस्क्यू केल्याचं पाहायला मिळतं.
यात अनेक नागरिक जेसीबीवर बसलेले पाहायला मिळतात. नागरिकांना घेऊन हा जेसीबी पुराच्या पाण्यातून बाहेर पडताना दिसत आहे. JCB वर बसवून 33 नागरिकांची सुटका करण्यात आलेली आहे.शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.