मुंबई – राज्य सरकारमधील विविध विभाग आणि जिल्हा परिषदअंतर्गत 2.44 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. शासकीय विभाग व जिल्हा परिषदेतील 31 डिसेंबर, 2020 पर्यंतची ही माहिती आहे. एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या10 लाख 70 हजार 840 इतकी आहे. यापैकी 8लाख 26 हजार 435 ही पदे भरलेली आहेत. तर 2 लाख 44 हजार 405 इतकी पदे रिक्त आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती मागवली आहे. अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे 11 मे 2022 रोजी अर्ज सादर करत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गातील एकूण पदांची माहिती देताना मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. सामान्य प्रशासन विभागाने अनिल गलगली यांस गटनिहाय शासकीय व जिल्हा परिषदेतील गट अ, ब, क आणि ड मधील 31 डिसेंबर 2020 यापर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली.
अनिल गलगली यांच्या मते रिक्त पदामुळे शासकीय सेवेत दिरंगाई होऊन सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागात रिक्त पदांची संख्या अधिक आहे. सरासरी 23 टक्के पदे रिक्त असली तरी काही विभागात 30 ते 50 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त असल्याची खंत अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे. शासनाने तत्काळ ही रिक्त पदे भरावीत अशी मागणी गलगली यांनी केली आहे.
एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हापरिषद यात मंजूर पदांची संख्या 10 लाख 70 हजार 840 इतकी आहे. ज्यापैकी 8 लाख 26 हजार 435 ही पदे भरलेली आहेत. तर 2 लाख 44 हजार 405 ही पदे रिक्त आहेत. यात शासकीय कर्मचाऱ्यांची 1 लाख 92 हजार 425 तर जिल्हापरिषदेच्या 51हजार 980 अशी एकूण 2 लाख 44 हजार 405 पदे रिक्त आहेत. गृह विभागाची एकूण मंजूर पदे 2 लाख 92 हजार 820 असून त्यापैकी 46 हजार 851 पदे रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाची एकूण मंजूर पदे 62 हजार 358 असून त्यापैकी 23 हजार 112 पदे रिक्त आहेत.