उस्मानाबाद- पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आता पोलिसांवर गावगुंडांनी हल्ला केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत अवैध कत्तलखान्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गावगुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली. तर दुसऱ्या घटनेत डीजेला विरोध केला म्हणून थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला करण्यात आल्याची घटना शेगाव येथे घडली आहे.
उस्मानाबाद येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात समाधान नवले आणि बबन जाधव हे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. समाधान नवले यांच्या डोळ्याला मार बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इथल्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काही तक्रारदारांनी येऊन खिरणीमळा भागामध्ये अवैध पद्धतीने कत्तलखाने सुरु असल्याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक रात्री पावणे अकराच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी एका पत्र्याच्या शेडमध्ये बारा ते चौदा लहान मोठी जनावरे कापलेली दिसून आली तसेच मांस अस्ताव्यस्त पडल्याचे पोलिसांना दिसले. तिथे असलेल्या चार लोकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पळून गेले व लांब जाऊन पोलिसांच्या पथकावर त्यांनी हल्ला चढवला.
त्याचवेळी आणखी दोनजण त्या ठिकाणी आले. त्यांनी देखील पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. ज्यांनी याबाबत तक्रार दिलेली होती, त्यांना जनावरे कापण्यासाठी वापरण्यात येणारे हत्याराने वार केले. तसेच मारहाण देखील केली. सदरचा अवैध कत्तलखाना नगरसेवक खलिफ कुरेशी यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवर खलिफा कुरेशी, त्याचा भाऊ कलीम कुरेशी यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना शेगाव येथे घडली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास मोठ्या आवाजात डीजे पार्टी सुरू असल्याची तक्रार शेगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन डीजे बंद केला. काही वेळेनंतर काही अज्ञात व्यक्तींनी थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. जवळपास 30 जणांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. या जमावाने पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची तोडफोड केली. पोलिसांनी आठ ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.