नवी दिल्ली : आत्तापर्यंत आपण महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना ऐकल्या वाचल्या असतील. हुंडाबळी, शारीरिक, मानसिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक महिलांना न्यायालयाने न्याय मिळवून दिला आहे. पण आता एक अनोखी घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली उच्च न्यायालयात एका पत्नीपीडित पतीने याचिका दाखल केली होती. वाद झाल्यानंतर पत्नी अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करायची. यासाठीच पतीने कौटुंबिक न्यायालयात सुरुवातीला न्याय मागितला होता. कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटास मंजुरी देखील दिली होती. पण पत्नीने उच्च न्यायालयात पुन्हा दाद मागितली. दरम्यान उच्च न्यायालयाने देखील कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याच घोषित केलं आहे.
यावेळी उच्च न्यायालयाने आपला निर्णय देताना म्हटले आहे की, कौटुंबिक न्यायालयाने याबाबत जुलै 2022 ला निर्णय दिला होता. पतीने ही गोष्ट कोर्टासमोर सिद्ध केली की, कशाप्रकारे पत्नी पतीला आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देत होती. नेहमी वाईट पद्धतीने वागवत होती. याच आधारावर कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटास मंजुरी दिली होती. कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने जगता आले पाहिजे, असे देखील उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.