Special Report : वादाच्या भोवऱ्यात सापडणारी नृत्यांगना गौतमी पाटीलची कहाणी ! कसा आहे तिचा आतापर्यंतचा प्रवास

1008 0

अनेक लावणी कलाकार तिच्यावर नाराज आहेत. लावणीच्या परंपरेला गालबोट लावण्याचा आरोपही तिच्यावर केला जातो. अशी कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडणारी ती म्हणजे गौतमी पाटील नक्की कोण आहे? बॅक डान्सर ते सोशल मीडिया स्टार हा तिचा प्रवास कसा सुरू झाला? तिची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे ? 

धुळ्याच्या शिंदखेडा गावात गौतमी पाटीलचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर काही दिवसातच वडिलांनी आईला सोडलं. त्यामुळे आजोळीच ती लहानाची मोठी झाली. 8 वी पर्यंत तिने वडिलांना पाहिलंही नव्हतं. आठवीत असताना ती आई वडिलांसोबत पुण्यात राहू लागली. पण वडील दारू पिऊन तिच्या आईला मारायचे. त्यामुळे वडिलांना सोडून ती आणि आई सोबत राहू लागल्या. आई छोटी मोठी काम करून घर चालवायची. पण पीएमटी बसमधून पडून तिच्या आईचा अपघात झाला. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी गौतमीवर आली.

सुरुवातीपासूनच पुण्यातील विश्व कला नृत्य अकादमीमध्ये गौतमी नृत्य शिकत होती. त्यामुळे आईच्या अपघातानंतर नृत्य क्षेत्रातच काम करून गुजराण करायला तिने सुरुवात केली.

अकलूज लावणी महोत्सवात पहिल्यांदा गौतमीला बॅक डान्सर म्हणून नृत्याची संधी मिळाली. पुढे संपर्क वाढत जाऊन नृत्याच्या विविध सुपाऱ्या तिला मिळत गेल्या. सप्टेंबर 2022 पासून सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्रात गाजतय. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून अश्लील हावभाव करून नाचतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला. आणि तिथून गौतमी पाटील हे नाव चर्चेत आलं. एकीकडे तिच्या घायाळ करणाऱ्या अदाकारीची चर्चा होत असते तर दुसरीकडे तिच्या अश्लील नृत्यामुळे तिच्या कार्यक्रमांवर बंदी आणा अशी मागणी जोर धरते.

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे, माधुरी पवार या नृत्यांगनांनी तिच्या नृत्यावर आक्षेप घेतले. तिच्या नृत्यातून ती लावणीचा अपमान करत आहे, असं त्यांच म्हणणं आहे. तर तिच्या व्हिडिओमुळे लहान मुलांवर परिमाण होतो त्यामुळे तिच्या कार्यक्रमांवर बंदी आणा अशी मागणी राष्ट्र विकास सेनेने केली होती.

मध्यंतरी सांगलीच्या एका गावात तिच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला. आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे गौतमी पाटील प्रचंड ट्रोल झाली. तिच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यावेळी करण्यात आली.

सांगलीच्या बेडग गावातील एका शाळेच्या मैदानात गौतमी पाटीलचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला. दत्तात्रय ओमासे या 45 वर्षीय व्यक्तीचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता. कार्यक्रम पाहणाऱ्यांनी झाडावर गर्दी केली, झाड पडले,लोकांनी शाळेच्या कौलांचा चुराडा केला.

एकंदरीतच काय तर तिच्या डान्सवर बंदी आणा अशी मागणी जोर धरत असली तरी तिचा चाहता वर्ग मात्र वाढतोच आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तिचा मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. तिच्या कार्यक्रमांवर बंदी येईल की नाही हे सांगता येत नाही पण आता हीच गौतमी पाटील लवकरच चित्रपटातही झळकणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!