सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी येथील श्रीधर कोळी यांनी नव्यानेच ढाबा बांधला होता. सोमवारी 7 मार्च रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या या ढाब्याला आग लावण्यात आली. या घटनेत कोळी यांचे 11 लाखांचे नुकसान झाले. याबाबत जत पोलीस ठाण्यात श्रीधर कोळी यांनी सहा जणांविरोधात फिर्याद दिली आहे.
एखाद्या निवडणुकीत पराभव झाल्यास उमेदवाराकडून अथवा त्याच्या गटाकडून कधीकधी राग व्यक्त केला जातो. मात्र पराभवाच्या रागातून चक्क ढाबाच पेटवून देण्यात आला.जत तालुक्यातील मुचंडी सोसायटीची शनिवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस गटाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने एक हाती सत्ता मिळवली. यातील पराभवाचा राग मनात धरून विरोधी गटातील ढाबाच काही जणांनी पेटवला. या आगीत 11 लाखांचे नुकसान झाले असून याबाबत जत पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी महांतेश नारायण मलमे, नारायण मलमे, दर्याप्पा मलमे, प्रकाश मलमे, प्रविणकुमार मलगोंडा पाटील, श्रीनिवास मलगोंडा पाटील, अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.