TOP NEWS INFO : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ चे गीतकार राजा बढे यांचा जीवनप्रवास…VIDEO

290 0

TOP NEWS INFO : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीताचा दर्जा दिला जाणार आहे. ज्येष्ठ कवी राजा बढे यांनी हे गीत लिहिलं होतं. या निमित्तानं जाणून घेऊयात कवी राजा बढे यांचा जीवनप्रवास… आजच्या TOP NEWS INFO मध्ये… 

संपादक, अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, मराठी कवी आणि गीतकार अशी राजा बढे यांची ओळख. त्यांचा जन्म नागपुरात झाला. प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झालं. 1935 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी वर्षभर नागपूरच्या ‘दैनिक महाराष्ट्र’मध्ये सहसंपादक म्हणून तर त्याच दरम्यान वागीश्वरी मासिकाच्या संपादक मंडळात काम केले.

1956 ते 1962 या कालावधीत ते आकाशवाणीत निर्माता म्हणून कामास होते. 1940 च्या सुमारास त्यांनी चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स’ मध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर 1942 मध्ये ते ‘प्रकाश स्टुडिओ’त रुजू झाले. बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी ‘स्वानंद चित्र’ ही संस्था उभी केली आणि ‘रायगडचा राजबंदी’ या संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती केली.

नागपुरातील महाल परिसरात त्यांचं निवासस्थान असून महापालिकेनं बांधलेल्या स्मारकाच्या माध्यमातून त्यांची स्मृती आजही जपली जात आहे. त्यांच्या साहित्य संपदेत अठरा काव्यसंग्रह, चार नाटकं, नऊ सांगीतिका, पाच एकांकिका आणि एका कांदबरीचा समावेश आहे. 7 एप्रिल 1977 रोजी राजा बढे यांचं निधन झालं. अशा या महान कवीनं लिहिलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या अजरामर गीताला दिला जाणारा राज्य गीताचा दर्जा म्हणजे त्यांच्या काव्यप्रतिभेचा सन्मान होय.

Share This News
error: Content is protected !!