मुंबई : आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये सुमारे एक तास बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार का ? या चर्चांना उधाण आले असतानाच आता महाविकास आघाडीमध्ये देखील मोठी बैठक सुरू झाली असल्याची माहिती मिळते आहे. या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे पोहोचले असल्याचे समजते. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये चौथा पक्ष एन्ट्री करणार का ? अशीच चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर ही बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी सुभाष देसाई, अशोक चव्हाण, छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटला आहे की, महाविकास आघाडीला मजबूत होण्याच्या दृष्टीने हे एक चांगलं पाऊल आहे. प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत. सगळ्या धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने त्यांची मोट बांधण्याचे काम शरद पवार साहेब उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी करायला हवं. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येऊन काम केलं तर निश्चितच स्वागत असेल ती आनंदाची बाब आहे. असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत.