मुंबई- मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना भर विधिमंडळात रडू कोसळल्याची घटना घडली. पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील विषयावर शेळके यांनी लक्षवेधी लावली होती. मात्र ती लागत नसल्यानं ते नाराज झाले. आपली व्यथा सांगताना शेळके यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या विषयाबाबत अजित पवार यांची भेट घेतली त्यांनी मीटिंग लावण्याचं आश्वासनं दिलं आहे. विधानसभेत देखील मला मीटिंग लावण्याचं आश्वासन मिळालं आहे. त्यांना हा विषय मार्गी लावावाच लागेल. मात्र हा विषय मार्गी न लावल्यास 2011 साली जे प्रकरण झालं होतं. याची पुन्हा पुनरावृत्ती होईल. कारण त्यावेळी जे आंदोलन झालं होतं ते याच विषयासाठी झालं होतं.
आमदारांना घरे देण्याचा निर्णय स्वागतार्ह
आमदार सुनील शेळके म्हणाले की, आमदारांना घरं देण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण अनेक आमदार असे आहेत जे लोकवर्गणीतून आमदार आहेत. त्यांची परिस्थीत हालाखीची आहे. त्यांना घर मिळणे गरजेचं आहे. आमच्या सारख्या शहराच्या जवळ राहणाऱ्या सधन आमदारांनी मनाचा मोठपणा दाखवावा असंही ते म्हणाले.