नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील ज्येष्ठ, अनुभवी, अभ्यासू नेते म्हणून त्यांचा सर्वच राजकीय पक्षाचे नेते आदर करत असतात. पंतप्रधानांपासून ते अनेक राजकीय पक्षाचे नेते पवारांचा नेहमीच सल्ला घेत असतात. राजकीय नेतेच नाही तर प्रशासकीय अधिकारीही पवारांचा सल्ला घेत असतात इतका पवारांचा राजकारणाचा आणि प्रशासनाचा गाढा अभ्यास आहे.
शेतीपासून ते ग्रामीण समस्या, तंत्रज्ञानापासून नागरी समस्या, संरक्षण क्षेत्रापासून ते परराष्ट्र धोरणापर्यंत अनेक विषयावर पवारांचा विशेष अभ्यास आहे. सहकार क्षेत्रातील अभ्यासाबाबत पवारांचा हात धरेल असा नेता जवळपास नाहीये. त्यामुळेच केंद्रात नव्याने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयालाही पवारांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
सहकार खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी काल दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली. यावेळी या अधिकाऱ्यांनी पवारांशी चर्चा केली. शरद पवार यांनी खुद्द ट्विट करून ही माहिती दिली आहे. सहकार मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी काल माझी दिल्लीतील माझ्या निवासस्थानी भेट घेतली. सहकार क्षेत्रातील माझे अनुभव सांगण्याची त्यांनी मला विनंती केली. तसेच सहकार मंत्रालय अधिक परिणामकारक चालवण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले देण्याची विनंतीही त्यांनी मला केली, असं शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात सक्रिय राहिलो आहे. मी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. सचिव घनश्याम कुमार, ज्वॉईंट सेक्रेटरी पंकज कुमाल बन्सल, डेप्युटी डायरेक्टर सुचिता, चीफ डायरेक्टर लिलत गोयल आदी अधिकारी या शिष्टमंडळात होते, असं पवार यांनी म्हटलं आहे.
देशात पहिल्यांदाच सहकार मंत्रालय
देशात सहकार क्षेत्राचं मोठं जाळं आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तर सहकार क्षेत्राची परंपरा मोठी आहे. सहकाऱ्याच्या माध्यमातून या दोन्ही राज्यांनी मोठा विकास साधला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नवं सहकार मंत्रालय निर्माण केलं. अमित शहा यांच्याकडे गृहखात्यासोबतच सहकार खात्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली. अमित शहा हे गुजरातचे आहेत. त्यांचं गुजरातच्या सहकार चळवळीत मोठं योगदान आहे. या क्षेत्राचा त्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे या खात्याची त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक
साखर उद्योगाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्ली येथे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली. गोयल यांच्याशी साखर हंगाम 2022-23 साठी साखर निर्यात धोरण आणि 3 जानेवारी 2022 रोजी अधिसूचित SDF नियम-26 अंतर्गत SDF कर्जाच्या पुनर्रचनेसाठी ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा याबद्दल विस्तृत चर्चा केली यावेळी प्रकाश साळोंखे आणि प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकारी साखर महासंघ उपस्थित होते.