मुंबई- मनी लॉन्ड्रिग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख , त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आजपासून केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असणार आहेत. या चौघांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे एक पथक आर्थर रोड तुरुंगात तर दुसरे तळोजा कारागृहात पोहोचले आहे.
अँटिलीया स्फोटक प्रकरणातील कारचे मालक महसुख हिरेन हत्याप्रकरणी एनआयएने सचिन वाझेला १३ मार्च २०२१ ला अटक केली होती. तसेच शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांना ईडीने अटक केली होती. या प्रकरणी देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना देखील अटक केली होती.
आता या चार आरोपींना सीबीआयने आपल्या ताब्यात घेतले आहे. चौघांनाही अटक करण्यासाठी सीबीआयने शुक्रवारी विशेष पीएमएलए न्यायालय आणि विशेष एनआयए न्यायालयात अनिल देशमुख यांच्याविरुद्ध नोंदवलेत्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना अटक करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने या चौघांनाही ताब्यात घेण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं आहे. खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी पत्रातून केला होता.
परमबीर यांच्या लेटरबॉम्बनंतर निलंबित एपीआय सचिन वाझे याच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली होती.