पुणे- सध्या राज ठाकरे यांनी राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलला आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यालाही हात घातला आहे. नेमके याच वेळी पुण्यात राज ठाकरे यांनी पूर्वी काढलेल्या एका व्यंगचित्राचे बॅनर्स चौकाचौकात झळकले आहेत. या होर्डिंग्जची चर्चा शहरात रंगली आहे.
या व्यंगचित्रात विश्व हिंदू परिषद आणि भाजपावर राज ठाकरे यांनी टीका केली आहे. भाजपच्या ‘चलो अयोध्या’ या घोषणेवर प्रभू रामचंद्र खडसावून विचारताना दिसतात. ‘देश घातला खड्ड्यात, आता माझ्या नावाने गळा काढत आहात. अरे, लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितले होते, रॅम मंदिर नव्हे !’असे रामचंद्र विचारात आहेत असे या व्यंगचित्रात दाखवले आहे.
या व्यंगचित्राच्या वर असे लिहिण्यात आले आहे की, अशी वेळ कोणावरही येऊ नये. उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि रॅम मंदिराला विरोध करून व्यंगचित्र काढणाऱ्या राज ठाकरे यांना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व.
हे बॅनर कुणी लावले हे समजू शकले नाही. मात्र या बॅनरची शहरात जोरदार चर्चा आहे.