पुणे : याद राखा गुंडांनो, नागरिकांना नडाल तर पोलिसांकडून धू-धू धुतले जाल..! पुणे पोलीस आहेत हे पुणे पोलीस… त्यांच्या नादाला लागाल तर फोडले जाल..! कोयत्याच्या धाकानं नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या गावगुंडाला पुणेरी पोलिसांनी असा धुतला, असा धुतला की त्याला भर रस्त्यात कपडे फाटेपर्यंत तुडवला. या पुणेरी सिंघम पोलिसांच्या बहादुरीचा डंका आज साऱ्या महाराष्ट्रभर गाजतोय. कोण आहेत हे बहादूर पोलीस ? आणि काय केली त्यांनी बहादुरी ? पाहूयात TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट… पुण्याचे सिंघम ! जो नागरिकांना नडला, त्याला पोलिसांनी तोडला !
हेच ते सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सिंह ! मार्शल अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील ! या दोघांनी जिवाची पर्वा न करता जी बहादुरी दाखवली त्याला तोड नाही. तारीख होती 28 डिसेंबर आणि वेळ होती रात्रीची… दारू ढोसून फुल तररर झालेल्या कोयता गँगच्या दोन पंटरांनी सिंहगड कॉलेज परिसरात धिंगाणा घालायला सुरुवात केली… हातात कोयता घेऊन दुकानदारांना धमकावला लागले. रस्त्याकडील हातगाड्या फोडू लागले, रस्त्यातून ये-जा करणाऱ्या आया-बहिनींना, विद्यार्थ्यांना कोयत्याचा धाक दाखवून घाबरवू लागले. रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींवर आणि चालत्या मोटारींवर कोयत्यानं वार करू लागले. एका हॉटेलात घुसून त्यांनी एका ग्राहकावर कोयताही चालवला. बराच काळ भर रस्त्यात हा असा धिंगाणा सुरू होता. तितक्यात, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील गस्तीवर असेलल्या मार्शलना याबाबत काही कॉलेजच्या तरुणांनी हा प्रकार सांगितला आणि मग सुरू झाला फिल्मी स्टाईलनं थरारक पाठलाग…
अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील या दोन मार्शलनी आपली मोटारसायकल काढली आणि आरोपींचा पाठलाग सुरू झाला. पोलीस मागावर असल्याच कळताच कोयता गँगच्या पंटर लोकांची पळता भुई थोडी झाली. एक पंटर सटकला पण दुसरा तावडीत सापडतोय असं लक्षात येताच हाती लाठी असलेल्या अक्षय इंगवले यांनी चालत्या मोटारसायकलवरून उडी घेतली आणि आरोपीच्या मागं मागं पळत सुटले. काही कळायच्या आत त्या पळपुट्या पंटरच्या पाठी लाठी बसली, तो खाली पडला आणि मग अक्षय इंगवले व धनंजय पाटील या अक्षरशः धू-धूत त्याचा चांगलाच माज उतरवला. अर्धमेला झालेला हा पंटरचं नाव आहे. करण दळवी पण या पाठलागात दुसरा पंटर सुजित रावसाहेब गायकवाड हा मात्र पोलिसांच्या हातून निसटला.
कोयता गँगच्या पंटरला पोलीस भर रस्त्यात काठीनं चोप देत असल्याचं दृश्य पाहून नागरिकांनी शिट्टया आणि टाळ्या वाजवल्या. काही जणांनी तर या संपूर्ण घटनेचं चित्रण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात दहशत माजवून कोयता गॅंगनं पोलिसांच्या नाकात दम आणला होता. कोयता गॅंगनं एकप्रकारे पुणे पोलिसांना आव्हानच दिलं होतं पण पुणे पोलिसांनी या कोयता गँगच्या पंटरना हे असं भर रस्त्यात तुडवल्याचं पाहिल्यानंतर नागरिकांना ही दबंगगिरी खूपच आवडली.स्वतःचा जीव धोक्यात घालून कोयता गॅंगची दहशत मोडून काढण्यात यशस्वी ठरलेल्या अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील या दोन पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होतोय. पुण्यासह इतर जिल्ह्यातील काही नागरिकांनी तर या दोघांचा सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात जाऊन सत्कार केला.
या अशा गुंडांना भर चौकात तुडवलंच पाहिजे त्याशिवाय या गुंडांवर पोलिसांची दहशत बसणार नाही आणि हे गावगुंड वठणीवर येणार नाहीत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याला जगलेल्या या दोन्ही पोलीस बहादरांना पुणेकर आणि TOP NEWS मराठी चॅनेलचा सलाम !