कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.
ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला. प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. आज सकाळी 11 वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोण होते प्रभाकर साईल ?
क्रुझ कारवाई प्रकरणातील प्रथम क्रमांकाचे नाव असणारे पंच हा पंच किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड होता. किरण गोसावींकडेच याची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था असायची.
क्रुझ कारवाईच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ?
प्रभाकर साईल यांनी जबाबात सांगितलं होतं की, ‘क्रूझ कारवाई झाली त्या दिवशी मी किरण गोसावींसोबतच होतो. किरण गोसावी एनसीबी ऑफिसला गेले. मी खालीच थांबलो होतो. गोसावी बरोबर सव्वा बारा वाजता खाली आले. आम्ही तिथून जवळच जाऊन फ्रँकी, थम्स अप घेतलं. तिथू ग्रीन गेटला गेलो. ग्रीन गेटच्या आत गेलो तेव्हा तिथे समीर वानखेडे, त्यांचे सहकारी बसले होते. तिथे त्यांना फ्रँकी आणि पाणी-थम्सअप वगैरे दिले. नंतर क्रूझच्या बाहेर गेलो. तिथून मला एका ठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको, असं सांगितलं. मला काही फोटो दाखवण्यात आले होते आणि ते फोटो असलेले लोक आले की त्यांना ओळखायला सांगितलं होतं. फोटोतल्या व्यक्ती आल्या की मला गोसावींना रिपोर्ट करायचं होतं’.