मुंबई- पेट्रोल आणि डिझेलवरील कमिशन वाढवण्यासाठी आज देशभरातील सुमारे 70 हजार पेट्रोल पंप चालकांनी 31 मे रोजी ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल खरेदी न करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपल्या वाहनात इंधन भरून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. कारण इंधन तुटवडा निर्माण होऊ शकतो.
मंगळवारी देशातील 24 राज्यांमधील सुमारे 70 हजार पेट्रोल पंप मालक ओएमसीच्या कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीविरोधात आंदोलन करत आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात वाढ केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्याना प्रचंड नफा होत आहे. मात्र डीलर्सच्या कमिशनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, अशी तक्रार पंप चालकांनी केली आहे. त्यामुळे कंपन्यांकडून एक दिवस तेल न घेण्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनुराग जैन म्हणाले की, या आंदोलनाचा किरकोळ विक्री आणि ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. पेट्रोल पंपावर दोन दिवसांचा साठा आहे. त्यामुळे मंगळवारीही ते किरकोळ ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलची विक्री करणार आहेत. त्याचा प्रभाव फक्त कंपन्यांकडून होणाऱ्या खरेदीपुरता मर्यादित असेल.