९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मोठा आरोप केला. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज कार दिल्यावर एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. नीलम गोऱ्हे यांच्या या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटातून संताप व्यक्त केला जात आहे. गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबईतील सिल्वर रॉक्स या निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेतून त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वाक्यव्याचा समाचार घेतला. शरद पवार म्हणाले, नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे आहे. गोऱ्हे चार वेळा विधान परिषदेच्या आमदार कशा झाल्या हे सर्वांना माहिती आहे. असं वक्तव्य करायचं होतं तर गोऱ्हे यांना साहित्य संमेलनात जाण्याची आवशक्यता नव्हती. एका मर्यादित काळात त्यांनी चार पक्षांचा अनुभव घेतला आहे अशा शब्दांत शरद पवार यांनी नीलम गोऱ्हे यांना सुनावलं आहे.
दरम्यान साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय चिखलफेक झाली. त्याची जबाबदारी शरद पवार नाकारु शकत नाही. ते सुद्धा त्याला जबाबदार आहे. संमेलन अध्यक्षा तारा भवाळकर जबाबदार आहेत. तुमच्यावर (SHARAD PAWAR) चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो ना? मग आता उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप होत असताना पवार साहेब गप्प कसे राहू शकतात? नीलम गोऱ्हे ही कोण बाई आहे, ते कोणते भूत आहे. हे साहित्य संमेलन नव्हतेच, त्यात राजकारण झाले, असा घणाघात राऊत यांनी केला. यावर देखील शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर हरकत नाही. असं म्हणत राऊत यांना पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.