आजकाल शिक्षण खूप महाग झाले आहे. प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणाचे शुल्क सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले. शाळेपर्यंतच्या शुल्काची तरतूद सामान्य नागरिक कशीबशी करू शकतो, मात्र महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणाचे शुल्क हे आटोक्याबाहेरचे राहते. अशावेेळी पालकांना एकच आधार राहतो आणि तो म्हणजे शैक्षणिक कर्जाचा.
शिक्षण कर्ज म्हणजे काय?
इंजिनिअरिंग, मेडिकल आणि एमबीए अथवा बीटेकसह कोणत्याही व्यावसायिक शिक्षणाचे शुल्क जादा असते आणि ते सामान्यांना परवडणारे असतेच असे नाही. यामुळे बँकांनी आपल्या ग्राहकांना एज्युकेशन लोन किंवा स्टुडंंट लोन नावाची कर्ज योजना आणलीे. या कर्ज योजनेचा लाभ घेत कोणताही पालक हा आपल्या मुलाला चांगल्या शिक्षण संस्थेत शिकवण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. एज्यूकेशन लोन हे देश आणि परदेशात यापैकी कोणत्याही ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी दिले जाते.
एज्युकेशन लोनमध्ये कशाचा समावेश?
साधारणपणे सर्व बँकांच्या एज्युकेशन लोनमध्ये शिक्षण अणि शिक्षणादरम्यान येणारा संपूर्ण खर्चाचा समावेश असतो. एकूण खर्चाच्या 90 टक्के कर्ज बँकेकडून दिले जाते. या खर्चात ट्यूशन फीस, म्हणजे कॉलेजची फीस, पुस्तकांचा खर्च, हॉस्टेलचा खर्च, खानपानाचा खर्च, प्रवासाचा खर्च, पुस्तक, गणवेश, परीक्षा फीस आदींचा समावेश असतो.
एज्युकेशन लोनचे फायदे
एज्युकेशन लोन घेणार्या व्यक्तीला प्राप्तीकर कायद्यानुसार कर्जाच्या रक्कमेवर आकारण्यात येणार्या व्याजावर करसवलत मिळते. याशिवाय एज्युकेशन लोनमुळे बचतीवर परिणाम होत नाही. कारण कर्जाचा हप्ता हा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरू होतो आणि त्याची परतफेड करण्यासाठी पंधरा वर्षाचा कालावधी मिळतो. पण कर्जाच्या रक्कमेचा वापर सुरू केला की व्याज आकारणी सुरू होते अणि दीर्घकाळापर्यंत हा व्याजदर जादा राहू शकतो.
एज्युकेशन लोनचे प्रकार
एज्युकेशन लोन हे अनेक प्रकारचे आहेत. देशातील बँकांकडून विविध प्रकारचे एज्यूकेशन लोन उपलब्ध करून दिले जाते. यापैकी काही कर्ज अभ्यासक्रमावर आधारित असतात तर काही कर्ज सर्टिफिकेट कोर्ससाठी दिले जातात. डिप्लोमासाठी कर्ज मिळतेच असे नाही. काही एज्युकेशन लोन केवळ कौशल्य आधारित अभ्यासक्रमासाठी असतात. अनेक बँकांकडे कर्जाच्या अनेक योजना असून त्यानुसार प्रोफेशनल कोर्सेसना कर्ज दिले जाते.
एज्युकेशन लोनचा व्याजदर
मेडिकल स्टुडंटला देशात किंवा देशाबाहेर शिक्षण मिळवण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळू शकते. मेडिकल विद्यार्थ्यांसाठी काही बँकांनी वेगळी योजना आणली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीचे व्याजदर साधारपणे 8.75 टक्क्यांपासून सुरू होते. याप्रमाणे अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांंसाठी देखील व्याजदर 8 ते 14 टक्क्यांपर्यंत आहे. प्रत्येक कर्जाचा व्याजदर हा योजना आणि अभ्यासक्रमानुसार निश्चित केली जाते. अनेक बँकाकडून विद्यार्थिनींना कमी व्याज दरात शैक्षणिक कर्ज देण्याची ऑफर देण्यात येते.
कोणत्या संस्थांसाठी शैक्षणिक कर्ज?
एज्युकेशन लोनसाठी देश किंवा विदेशातील कोेणत्या शैक्षणिक संस्थां पात्र आहेत हे पाहिले पाहिजे. वास्तविक सर्वच बँकांचे निकष वेगवेगळे असतात. बहुतांश बँका देश आणि विदेशातील शैक्षणिक संस्थांची यादी तयार करतात. शैक्षणिक संस्थांची मान्यता, रेटिंग, कामगिरी यासारख्या गोष्टीच्या निकषावर यादी तयार केली जाते. बँकांच्या यादीत शैक्षणिक संस्थांचे नाव असेल तर त्यास सहजपणे कर्ज उपलब्ध होते. नाव नसेल तर बँकेकडून त्यास नकार दिला जातो किंवा संबंधित संस्थेकडून माहिती मिळवण्यासाठी वेळ मागितली जातो.
कर्जासाठी पात्रता
शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराला भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे. त्याचे वय 18 ते 35 दरम्यान असावे. संबंधित संस्थांचे ऑफर किंवा अॅडमिशन लेटर बाळगणे गरजेचे आहे. आतापर्यंत शिक्षण घेतलेल्या संस्थेची कागदपत्रे सादर करावी लागतात. परदेशात शिकायचे असेल तर अर्जदाराकडे पासपोर्ट असणे गरजेचे आहे. पालकाचे सहा महिन्यांचे बँक डिटेल्स, तीन वर्षाचे प्राप्तीकर विवरण, केवायसी, पालकाची संपूर्ण माहिती देणारे कागदपत्रे असावीत.
जामीनदाराची गरज आहे का?
शिक्षण कर्ज घेताना किमान चार लाखांपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची गरज भासत नाही. केवळ पालकाचे उत्पन्न समाधानकारक असणे गरजेचे आहे. बँका पालकांच्या उत्पन्नाबाबत समाधानी नसतील, तर ते थर्ड पार्टीची हमी किंवा कोणत्याही प्रकारची लिक्विड गॅरंटी, मालमत्तेच्या हमीची मागणी करू शकतात.
किती कर्ज मिळेल?
शिक्षण कर्जात अर्जदाराला साधारपणे दीड लाखांपासून ते पाच लाखांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज मिळू शकते. यापेक्षा अधिक खर्च असेल तर बँकांकडून मंजुरीची प्रक्रिया केली जाते. शिक्षणाच्या खर्चावर कर्जाची रक्कम अवलंबून असते.
जेवढी रक्कम, तेवढेच व्याज
काही मंडळी पाल्याच्या पहिल्या वर्षाचा खर्च वहन करू शकतात. परंतु एखाद्या कारणावरून पालक शैक्षणिक खर्च उचलू शकले नाही तर त्याचे शिक्षण अडचणीत येऊ शकते. अशावेळी पालकांनी आपल्या मुलासांठी शैक्षणिक कर्ज मंजूर करून ंठेवावे. गरज भासल्यास त्याचा वापर करावा. जोपर्यंत आपण रक्कम वापरत नाहीत, तोपर्यंत त्यावर व्याज आकारणी होणार नाही.