पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच चाललीये. काल शुक्रवारी रात्री पुणे-सातारा महामार्गावरील वेळू येथील श्रीराम पेट्रोल पंपावर काही अज्ञातांनी कामगारांवर कोयत्यानं हल्ला करत 22 हजार रूपये लुटले. हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.
पुणे-सातारा महामार्गावरील वेळू गावच्या हद्दीत तुषार जगताप यांच्या श्रीराम पेट्रोल पंपावर काल रात्री साडे अकराच्या सुमारास कोयता गॅंगनं दरोडा टाकला. पाच अज्ञातांनी सशस्त्र दरोडा टाकून 22 हजार रुपये लुटले. तीन कामगारांसह एका सुरक्षारक्षकाला कोयत्यानं मारहाण केल्यानं ते गंभीर जखमी झाले. शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पाच जण दोन दुचाकींवरून पेट्रोल पंपावर आले. त्यांनी सुरक्षारक्षक भरत परिहार यांच्या हाताला पकडून पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये आणले.
त्यानंतर कॅश द्या, असं ओरडत त्यांना शिवीगाळ केली. 22 हजार रुपये लुटत कोयत्यानं सुरक्षारक्षक आणि इतर तीन कामगारांना गंभीर जखमी केलं. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या दिशेनं पलायन केलं. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये. आहे. या प्रकरणी योगेश विनायक हिंगे यांनी आरोपींविरोधात भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीये. दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे आणि संजय सुतनासे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी या घटनेचा तपास करत आहेत.
पुण्यासह संपूर्ण जिल्ह्यात गेली काही दिवसांपासून कोयता गॅंगची दहशत वाढू लागलीये. कोयत्यानं हल्ला करणं, रोकड लंपास करणं आणि पळ काढणं हे प्रकार वाढू लागलेत. पोलिसांनी या कोयता गॅंगच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर लवकरात लवकर जरब बसवण्याची मागणी आता जोर धरू लागलीये.