पुणे : पुणे आणि चिंचवडमध्ये सध्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या दोन्ही जागांवर यापूर्वी भाजपचे आमदार विराजमान होते. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक आणि चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या या जागांवर आता भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमने-सामने आहेत.
आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्हीही प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते स्वतः मैदानात उतरून प्रचार करत आहेत. महाविकास आघाडीचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि चिंचवड मतदार संघाचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी आज खुद्द शरद पवार मैदानात उतरून प्रचार करणार आहेत. तर उद्या 23 फेब्रुवारी रोजी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कसबा मतदारसंघासाठी प्रचार करण्यासाठी पुण्यात दाखल होत आहेत.
दोन्हीही प्रमुख पक्षांनी आपली सर्वतोपरी ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच अटीतटीची होणार आहे.