पुणे : २६ फेब्रुवारी रोजी कसबा विधानसभा पोटनिवडणूक पार पडली आहे. येत्या दोन मार्च रोजी कोणता उमेदवार गुलाल उधळणार हे निश्चित होणार आहे. परंतु पुण्यात तत्पूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर सर्वत्र झळकत आहेत.
ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप आणि घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत असताना आता कोण विजयी होणाऱ्या याकडे लक्ष लागलं असतानाच आधी वडगावमध्ये आणि आता सारसबागेतही रवींद्र धंगेकर यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा असे बॅनर निकालापूर्वीच झळकत आहेत.
राष्ट्रवादीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच असे बॅनर झळकवले आहेत. भाजपा दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर भाजपने हेमंत रासने यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली असताना आणि थेट मुख्यमंत्र्यांनी देखील हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असताना निकालापूर्वीच होणारी ही बॅनरबाजी पाहून पुणेकरांच्या भुवया उंचावत आहेत.