पुणे- ऐतिहासिक लाल महालात लावणी नृत्य चित्रित करून व्हर्ल केल्याचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. या कृत्याचा अनेक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील लमहालात लावणी नृत्य चित्रित करून भावना दुखावल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात जगदीश मुळीक म्हणतात की, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने आणि पराक्रमाने पावन झालेला लालमहाल समस्त हिंदुंसाठी एक पवित्र स्थान आहे. ही केवळ एक वास्तू नसून हिंदवी स्वराज्याचा इतिहासाचे सोनेरी पर्व यात दडलेले आहे. त्यामुळे या वास्तुची गरिमा, पावित्र्य राखणे अत्यंत आवश्यकच आहे. समाजमाध्यमात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर व्हिडिओ हा लालमहलमध्ये चित्रित केला गेला असून यात लावणीवर नृत्य केल्याचा प्रकार आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. मुळीक पुढे म्हणाले, नृत्य सादर केल्याप्रकरणी नृत्यांगनेवर कारवाई तर करावीच, शिवाय तीला आतमध्ये जाण्यास कोणी मदत केली? सुरक्षारक्षक काय करत होते? जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका काय? याचीही उत्तरे मिळवून योग्य ती कारवाई तातडीने करावी, अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे.
राष्ट्रवादीचे आंदोलन ही नौटंकी
या विषयासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आंदोलन ही नौटंकी असल्याचे जगदीश मुळीक म्हणाले. लाल महालाच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेची आहे. सध्या पालिकेत प्रशासक आहे. त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. म्हणजे हे आंदोलन राज्य सरकार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात करत आहेत. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी ते आंदोलन करीत असल्याची टीका जगदीश मुळीक यांनी केली.