पुणे : पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकी संदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला असून , विसर्जन तोंडावर असताना स्वैर याचिका करणं चुकीचं असल्याचं कोर्टानं म्हटलंय.
गणपती विसर्जनाचा दिवस आता काही दिवसांवर आला असून पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीवरून सुरु झालेल्या वादावरील याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली. मुंबई हायकोर्टात आज या प्रकरणी सुनावणी झाली. पुण्यात मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक झाल्यानंतर अन्य मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्याच्या परंपरेला ‘बढाई समाज ट्रस्ट’चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात आव्हान दिलं होतं.
मानाच्या गणपतींआधी छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.