पुणे : पुण्यातील हडपसर मध्ये गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला . या अपघातामध्ये एक जण मृत्युमुखी पडला असून तीन जण गंभीर जखमी झाले असल्याचे समजते. मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , गुरुवारी पहाटे ६ च्या सुमारास हडपसर परिसरात एका मिक्सर कंटेनरने चार रिक्षा आणि एका कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये एक जण ठार झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही टक्कर एवढी जोरदार होती ती या मिक्सर कंटेनरच्या धडकेने एक मोठे झाड देखील उन्मळून पडले आहे. हे झाड एका व्यक्तीच्या अंगावर पडले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य केले. कंटेनरला हटवण्यासाठी क्रेनची मदत घेऊन कंटेनर बाजूला हटवण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार एका चुकीच्या दिशेने आलेल्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या झटापटीत या मिक्सर कंटेनरने बाजूला उभी असलेल्या रिक्षावर कंटेनर घातला.
त्यानंतर या कंटेनर चालकाला आपल्या वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही . आणि त्यांनी तिथे उभ्या असलेल्या चार ते पाच रिक्षांना ठोकरले. आणि त्यानंतर हा कंटेनर झाडाला जाऊन धडकला. या अपघातात या कंटेनरचा क्लिनर मृत्युमुखी पडला आहे . तर तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.