मुंबई : सावरकरांना भारतरत्न मिळण्यासोबतच अनेक मुद्द्यावर शिवसेनेची स्वतःची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. असे असूनही अत्यंत हीन पद्धतीचे आरोप भारतीय जनता पार्टीकडून होत आहेत. आशिष शेलार यांनी निराधार विधान केले आहे. आशिष शेलार यांचा सुरू असलेला जागर नसून कांगावा आहे. जो पर्यंत एखादी व्यक्ती शिवसेनेवर टीका करत नाही तोवर प्रमोशन मिळत नाही , म्हणून आशिष शेलार टीका करत आहेत पण त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जातं नाही फक्त मुंबई अध्यक्ष केलं. त्यामुळे अशी विधाने करीत आहेत.
काँग्रेससोबत आम्ही महाविकास आघाडीत असलो तरी, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सोडले नाहीत. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असणे आणि आघाडी म्हणून एकत्र राहणे या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. रामा शिवाय हिंदुत्व नाही आणि हिंदुत्वाशिवाय शिवसेना नाही. आणि सावरकर हे कट्टर हिंदुत्व समर्थक होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना आणि नसताना देखील अयोध्येला जाऊन हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही चाललो आहोत.
भारत जोडो मध्ये नफरत छोडो असा संदेश देत असल्याने आदित्य ठाकरे गेलेत याचा अर्थ आम्ही राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन करतो असे होत नाही. भारतीय जनता पक्ष मात्र स्वतः मेहबुबा मुफ्तीच्या बरोबर गेलेत आणि स्वतः जे काम करत आहेत ते त्यांना दिसत नाहीयेत का ? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
वसईच्या श्रद्धा वालकरच्या केसबाबत लवकरच राज्याच्या गृहमंत्री यांना भेटणार आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांना मदत व्हावी या उद्देशाने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची यासाठी नियुक्ती करावी अशी शिफारस करणार असल्याचे देखील यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हंटले आहे.