मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लखनौमध्ये जंगी स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला बुलेटप्रूफ कार

1652 0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि खासदारांसह विशेष अयोध्या दौरा करत आहेत. या दौऱ्याची खूप चर्चा आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लखनौ विमानतळावर पोहोचले. या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने त्यांच्या दिमतीला बुलेटप्रूफ कार देण्यात आली आहे.

राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. एकनाथ शिंदे लखनौ विमानतळावर पोहोचताच जय श्री रामच्या घोषणांचा आवाज घुमला. ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.

तत्पूर्वी अयोध्येला रवाना होताना मुंबई विमानतळावर शिवसेनेच्या आमदारांचा उत्साह पाहण्यासारखा होता. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातून चांगले काम व्हावे म्हणून प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अयोध्येला जात आहोत. आता चोर कोण ते लवकरच स्पष्ट होईल. लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली तर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “मागच्यावर्षी विमानतळावरुन आम्हाला माघारी परतावे लागले होते. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना अयोध्या दौऱ्याबाबत आग्रह केला होता”

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांची गाडी बदलण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुलेटप्रुफ कार देण्यात आलीय. एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण अयोध्या दौऱ्यात त्यांच्यासोबत शेकडो पोलीस असणार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच अयोध्येत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा कसा असेल ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ताफ्यासह रात्री लखनऊमध्ये मुक्काम करतील. त्यानंतर रविवारी दुपारी ते अयोध्येत राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील. शिंदेंच्या या अयोध्या दौऱ्यात शिवसेना आणि भाजप नेतेही सहभागी झाले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन, संजय कुटे, राम शिंदे हे देखील अयोध्येला रवाना झाले.

उपमुख्यमंत्रीही अयोध्येला जाण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व आमदार-खासदारांसह उद्या अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि सर्व आमदार-खासदारांच्या आदरातिथ्यात काहीच कमी पडू नये, यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उद्या अयोध्येच्या दौऱ्यासाठी जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

विरोधकांची टीका

रावणराज्य चालवणारे अयोध्येला जात आहेत, अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. तसेच या महाराष्ट्रात आम्ही पुन्हा रामराज्य आणू, असा टोलाही त्यांनी शिवसेना-भाजप सरकारला लगावला आहे. संजय राऊत यांनीही पाप धुण्यासाठी 40 आमदार अयोध्येला जात असल्याचे म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!