पुणे : काल भास्कर जाधव यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला. या घटनेवर राजकीय वर्तुळातून पडसाद उमटत असतानाच पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी नारायण राणे यांना थेट धमकी वजा इशारा दिला आहे. यावेळी रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, हा हल्ला राणे आणि राणे समर्थकांनी केला आहे..पण असे भ्याड हल्ले करायला त्यांना लाजा वाटत नाही. हा भ्याड हल्ला आहे. आम्हाला उगाच चिडायला लावू नका,”असा इशारा रूपाली ठोंबरे यांनी दिला.
त्याचबरोबर “नारायण राणे आणि त्यांच्या दोन पोरांनी आता आवरत घ्यावं. खरंच यांना बाळासाहेब ठाकरे यांचा शाप लागलाय. इथले कर्म इथेच फेडावे लागतील याची दक्षता त्यांनी घ्यावी. असे देखील वक्तव्य त्यांनी केले आहे.
दरम्यान भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली आहे. त्याचबरोबर काही स्टंप आणि पेट्रोलने भरलेल्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत. नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याचे बोलले जात असून, भास्कर जाधव यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान राणे पिता-पुत्रांवर केलेल्या जोरदार टीकेमुळे हा हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे. भास्कर जाधव करीत असलेली टीका अत्यंत खालच्या पातळीवर करत असल्याचा आरोप राणे समर्थक करत आहेत.