मुंबई – कथित पोलीस बदली घोटाळा प्रकरणी आता मुंबई पोलिसच फडणवीस यांच्या घरी चौकशीसाठी जाणार आहेत. राज्याच्या गृहमंत्रालयाने याबाबत तसा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या समर्थनार्थ उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचं भाजपनं ठरवले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप यांच्यातला संघर्ष आता आणखी वाढणार चिन्हे ओळखून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
फडणवीस हे बीकेसीच्या पोलीस ठाण्यात जाणार होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरही केले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला जाणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन पोलीस जबाब नोंदवणार आहेत. गृहखात्याच्या बैठकीत फडणवीस यांच्या घरी जाऊन पोलीस जबाब नोंदवतील निर्णय राज्याच्या गृहमंत्रालयाने घेतला आहे.
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण आणि पोलीस बदल्यांमधील घोटाळ्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी ही नोटीस बजावण्यात आली, असे सांगण्यात आले होते. मुळात बदल्यांमध्ये घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी घोटाळा बाहेर काढणाऱ्यांना चौकशीला बोलावलं जातंय, अशा शब्दांत फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच विधानसभेत व्हिडिओ बॉम्ब फोडला होता. भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यावर महाविकास आघाडी सरकारने अद्याप ठोस स्पष्टीकरण दिलेले नाही. फडणवीस यांच्या विनंतीनंतर सोमवारी महाविकास आघाडी सरकारकडून उत्तर देण्यात येणार आहे. दरम्यान, हा व्हिडिओ बनावट असल्याची चर्चाही सुरु आहे. त्यामुळे नक्की सरकाकडून पेन ड्राईव्ह व्हिडिओबाबत काय माहिती देण्यात येणार याचीही उत्सुकता आहे.