पुणे- न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेमध्ये आज, शनिवारी आंतरराष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्रांगणात गणितामधील पाय (π)चे चिन्ह विद्यार्थ्यांच्या रचनेतून करण्यात केले. यावेळी ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ.मंगलाताई नारळीकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
रमणबाग शाळेच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत 75 गणितीय खेळांची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली तसेच वर्गावर्गात जाऊन विद्यार्थ्यांना हे गणितीय खेळ खेळून दाखवले. या खेळांची माहिती असलेले ‘खेळ गणिताचे’ हे हस्तलिखित देखील विद्यार्थ्यांनी तयार केले. गणितामधील (पाय-π ) या चिन्हाची प्रतिकृती
मंगलाताई म्हणाल्या, ” गणिताच्या अभ्यासामधून विविधांगी विचार करण्याची क्षमता निर्माण होते. व्यवहारांमध्ये गणित अतिशय आवश्यक आहे” असे त्यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना एक कोडे घातले व गणिताची गंमत वापरून ते कसे सोडवायचे हेही सांगितले.
राधिका देशपांडे यांनी लिहिलेल्या व हर्षद गाडगीळ यांनी संगीतबद्ध केलेल्या,’ करा गुणांची बेरीज,वजा करा अवगुण’या गणित गीताचे गायन संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी केले. श्रीयश राशिनकर या विद्यार्थ्याने मंगलाताईंच्या जन्मतारखेचा रामानुजन चौरस तयार केला.या सर्व उपक्रमांबाबत मंगलाताईंनी विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील शिवले यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनात गणित अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी गणिताशी गट्टी करावी असा संदेश प्रास्ताविकातून दिला. योगेश पडदुणे यांनी गणित दिनाचे महत्त्व सांगितले.
दीपाली सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अवधूत शिंपी या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर गणित विभागप्रमुख अनघा काकतकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपप्रमुख अर्चना पंच, पर्यवेक्षक दिलीप रावडे व सुरेश वरगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विभागातील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.