पुणे : पुण्यामध्ये गस्त घालीत असताना एका पोलीस कर्मचा-याच्या डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी एका सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला उभे राहून विवेक साळुंखे (वय वर्ष 20) आणि मयूर आंबेकर (वय वर्ष 28) हे दोघेजण आरडाओरडा करत होते. यावेळी त्यांना गस्तीवर असणारे पोलीस शिपाई संदीप धुमाळ (वय वर्ष 31) यांनी घरी जाण्यास सांगितल्याच्या रागातून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये आरोपी विवेक साळुंखे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
या हल्ल्यामध्ये पोलीस शिपाई संदीप धुमाळ हे गंभीर जखमी झाली आहेत. धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विवेक साळुंखे आणि मयूर आंबेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे.