पुणे- कात्रजमध्ये एकापाठोपाठ एक सिलिंडरच्या स्फोटाने पुणे हादरले. प्राथमिक माहितीनुसार एकूण २० सिलिंडरचा स्फोट झाला. कात्रजमधील गंधर्व लॉन्स पासून आगम मंदिरच्या डोंगराकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाची सहा वाहने व जवानांकडून आग आटोक्यात आली आहे. या घटनेत एक इसम किरकोळ जखमी आहे. मात्र आणखी जीवितहानी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळी कात्रज अग्निशामक दलाबरोबरच कोंढवा आणि भवानीपेठ अग्निशमन केंद्रातील गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्फोट झालेले ठिकाण उंचावर असल्यामुळे तसेच रास्ता अरुंद असल्यामुळे सुमारे २०० फूट लांब पाइपच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत.
या भागात मोठ्या प्रमाणात छोटे हॉटेल्स आहेत. कालच या परिसरात हॉटेल समोरील अतिक्रमणावर मोठी कारवाई झाली होती. या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे 100 सिलिंडरचा साठा होता अशी माहिती समोर आली आहे.