शाळेचे स्नेहसंमेलन पाहून कारमधून घरी परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पाठलाग करून मोटारीवर हल्ला केला. मोटारीतील व्यक्तीला बेदम मारहाण करून सोडून दिले. ही थरारक घटना बारामती शहरात घडली.
वसंत लक्ष्मण साळुंके (वय ४२, रा. २९ फाटा, गुणवडी, ता. बारामती) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर बारामतीमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साळुंके आपले मेहुणे गणेश सूर्यवंशी यांच्यासह सावळ येथे शाळेच्या गॅदरिंगचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. तो संपल्यावर सूर्यवंशी पुढे गेले. फिर्यादी साळुंके हे त्यांची मोटार (एमएच-४२, एच-०९१७) मधून लाकडी रस्त्याने बारामती बाजूकडे येत असताना बारामती अॅग्रोच्या कन्हेरी फार्मजवळ पाठीमागून एक मोटारसायकल आली. त्यावर तिघे बसले होते. त्यांनी अंगात काळे टी शर्ट घातले होते. त्यांनी मोटारीमागे येत मोटारीवर दगड फेकून मारला. त्यामुळे काच फुटली. तेवढ्या वेळात त्यांनी दुचाकी मोटारीला आडवी लावली.
दुचाकीवरून खाली उतरत साळुंके यांना मोटारीबाहेर ओढून काठीने मारहाण केली. एकाने डोक्यात काठी मारली. त्यामुळे डोक्यातून रक्त येवू लागले. तिघांनी साळुंके यांना धरून मोटारीच्या पाठीमागील सीटवर बसवले. रस्त्यापासून २०० फूट आतमध्ये शेतात गाडी नेली. तेथे गेल्यावर ‘आज तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत पायाच्या नडगीवर काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यात साळुंके यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना पुन्हा मोटारीत घालत बारामती रस्त्याला आणून टाकण्यात आले.
तिघांनी काठीने केलेल्या मारहाणीत साळुंके यांच्या डोक्यात, डाव्या डोळ्यावर, डाव्या हातावर बेदम मार लागला. तसेच पाय फ्रॅक्चर झाला. हल्लेखोरांनी सोडून दिले. पोलिसांनी तिघांविरोधात प्राणघातक हल्ला, अपहरण आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. बारामती पोलीस पुढील तपास करत आहेत.