हिवाळी अधिवेशन नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष वेधून अजित पवार यांनी सभागृहात सवाल उपस्थित केला आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागला असून, जगभरात काय केलं जात आहे, याचा अभ्यास करण्यासाठी आपण समिती नेमणार आहात का? असा सवाल यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला.
चीनमध्ये सध्या कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाला आहे. चीनच्या राजधानी बीजिंग मध्ये 60% लोकांना कोरोना झाला असून मृतदेहांचे अक्षरशः खच पडले आहेत. औषध आणि बेड उपलब्ध नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागतोय. चीनसह जपान आणि ब्राझीलमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. जगभरामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली असतानाच, हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील राज्य सरकारला सवाल केला आहे.
अजित पवार म्हणाले की, “कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात दुबईतून आलेल्या जोडप्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढला. चीन, जपान, कोरिया, ब्राझिल या देशात कोरोनाचा नवीन व्हेरियंट सापडत आहे आणि कोविडची साथ पुन्हा सुरु झाली. चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. बेड शिल्लक नाहीत म्हणून तिथे कारमध्ये रुग्नांना अॅडमिट करण्याची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे आरोग्य सचिवांनी काल नव्या व्हेरियंटविषयी तपास आणि काळजी घेण्याचं आवाहन सर्व राज्यांना केलं आहे. त्यात आपलंही राज्य असेल. तर या सर्व गोष्टींचा विचार करता चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हायपॉवर कमिटी किंवा टास्कफोर्स आणि जगभरात काय केलं जात आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपण समिती नेमणार आहे का?”
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले कि, “कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी लवकरच एखादी समिती किंवा टास्क फोर्स तयार करण्यात येईल जो अपल्याला जगभरातील बाबींचे अपडेट देत राहिल.” असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.