IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट? फोन टॅपिंग प्रकरणात पुणे पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर

395 0

पुणे : पुणे पोलिसांनी एका प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविषयी न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला. रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप झाला होता.

पुणे पोलिसांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरील आरोपाबाबत न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली. पोलिसांनी सादर केलेला ‘क्लोजर रिपोर्ट’ न्यायालयानं स्वीकारल्यास प्रकरण बंद केले जातं. एखादा गुन्हा ‘चुकीनं’ नोंदवला गेला असेल किंवा तक्रार दिवाणी स्वरूपाची असल्याचं आढळून आलं असेल तर क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला जातो.

रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फेब्रुवारी 2022 मध्ये भारतीय टेलिग्राफ कायदा कलम 26 अंतर्गत येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेतृत्वाखालील उद्धव ठाकरे सरकार सत्तेत होतं. शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात नाना पटोले यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

Share This News
error: Content is protected !!