CHANDRAKANT PATIL : “माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे! आता हा वाद थांबवावा…!” मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा व्यक्त केली दिलगिरी

373 0

पुणे : महापुरुषांविषयी केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यात निदर्शने करण्यात आली. तसेच समता परिषदेच्या कार्यकर्त्याने त्यांच्यावर शाईफेक केल्याने प्रकरण अधिकच चिघळले होते. त्यानंतर पुण्यातील वाटेवर तापले आहे. झाल्याप्रकारावर दिलगिरी व्यक्त करून देखील असे प्रकार घडल्याने पाटील यांनी संताप व्यक्त केला. यानंतर पुन्हा आज “माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे ! आता हा वाद थांबवावा” असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

जय महाराष्ट्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते , महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे.

त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत . शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते.
मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो.

माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी ,ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी . तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे.

माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही . माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती.

Share This News
error: Content is protected !!