रायगड – बैलगाडा शर्यत सुरु असताना अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसल्यामुळे मोठा अपघात झाला. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना रायगड जिल्ह्यात नांदगाव येथील समुद्रकिनारी घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे गावोगावी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. रायगडमध्ये बैलगाडा शर्यत सुरु असताना भीषण दुर्घटना घडली आहे. शर्यतीदरम्यान एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसल्यामुळे तिघेण जखमी झाले आहेत. भाजपाचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती.
ही घटना उपस्थित प्रेक्षकांच्या मोबाईल कॅमेरात कैद झाली होती. त्यानंतर हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.